Tuesday 2 December 2014

थकलेल्या मुलाची गोष्ट

एक लहान मुलगा छोटी मोठी कामे करून आपल्या गंभीर आजार झालेल्या वडिलांची सेवा करत असतो.  आई सोडून गेलेली असते. त्याच्या मनातले काही विचार. 
--------------------------------------------------------------------------
लहानशा वयात या किती 
गेलो आहे अडकुन 
बागडण्याच्या वयामध्ये 
गेलो आहे कोमेजून 

बाबा असतात कायम 
आता अंथरुणाला खिळून 
हाल बघती आमचे 
बिचारे  मूक गिळून 

आई गेली आहे
आमची साथ सोडून 
जणू काही घराचा कणा 
गेला आहे मोडून 

नोकरी करूनच जीव
आता थकतो आहे भारी 
कामासंगे शाळा आणि अभ्यास 
अशी कसरत आहे न्यारी

वडिलांच्या आजाराचे गुपित 
मला कळतच नाही 
डॉक्टरकाका सांगे काय 
मला उमगतच नाही 

बालपणाचा पडला आहे 
आता मला विसर 
कोण जाणे  कधी याची 
भरून निघेल कसर?

नियतीचा असा कसा 
आम्हांवरच घाव 
जगाच्या पसाऱ्यात आहे 
का ईश्वराचा ठाव?

डॉक्टरकाका सांगा ना 
बाबा होतील ना हो बरे?
पहिल्यासारखे आलबेल 
होईल ना हे सारे?






No comments:

Post a Comment