Sunday 25 December 2016

विमुद्रीकरण

demonetisation.
विमुद्रीकरण
----------------------------------
नोटाबंदीमुळे  बाद  झाल्या
पाचशे आणि हजाराच्या नोटा
बराच मोठा चलनसाठा
झाला अचानक खोटा

अपुऱ्या तयारीनिशी
टाकले गेले पाऊल
चलनतुटवड्यामुळे अराजकतेची
लागली होती चाहूल

नवीन चलन म्हणून आली
पहिली दोन हजाराची नोट
रंग निघत असल्यामुळे
त्यातही निघाली खोट

दोन हजाराची नोट ही
कोणाची आहे बरे शक्कल
बरीच चर्चेत आहे
सध्या यामागची अक्कल

या नोटांचे शल्य
आहे काहीसे वेगळे
असून खिशात काही
होतो आम्ही पांगळे

आकारांमुळे नवीन नोटा
झाल्या एटीएममधून वजा
एटीएम झाले शोभेचे आणि
सर्वानाच मिळाली सजा

काळा आणि पांढरा असा भेदभाव
पैशालाही नाही चुकला
वर्णविरहित व्यवस्थेला
बिचारा पैसाही मुकला

विरोधकांच्या हाती आयते
मिळाले आहे गाजर
कधी नव्हे तो सामान्यांसाठी
फुटतो आहे पाझर

काही धनाढ्य लोकांनी
आळवला आहे नाराजीचा सूर
शेकोटीच्या नावाखाली
निघतो आहे वेगळाच धूर

नव्या काळ्या पैशासाठी
दलालांचे बँकेत लागले आकडे
काळ्या पैशाच्या खबरीसाठी
सरकारचे जनतेलाच साकडे

विनारोकड व्यवहारांसाठी
सरकारचा आहे आग्रह
पण नको ते तंत्रज्ञान
असा खूप जणांचा निग्रह

सरकारचे रोज येते आहे
नवनवीन धोरण
कधी लागणार आहे देशाला
फक्त पांढऱ्या पैशाचे तोरण

थोडीशी का होईना आपल्याला
सोसावी लागते आहे कळ
पण काही दिवसांनी निश्चित
मिळेल मधुर असे फळ
                 - Sameer J.
---------------------------------
---------------------------------







Tuesday 20 September 2016

आरक्षणाचे उडते घोडे

सूर्याचे असते का कधी आरक्षण
सगळ्यांना प्रकाश देताना
झाडे करतात कधी
वाटसरूंना सावली देताना
सोशल मीडिया वर असते का
एकमेकांचे मित्र बनताना 
सीमेवरील जवानांमध्ये असते का
धैर्याने शत्रूशी लढताना 
रानात पेटलेल्या वणव्यामध्ये असते का
मार्गी येईल ते भक्षण करताना 
पुराचे पाणी करते का कमी अधिक  
भोवतालचे वाहून नेताना 

मग आपण का बाळगली आहे
ही आरक्षणाची अडगळ 
मानवी जीवन जगताना?

कशाला पाहिजे हा जातीचा शिक्का 
जिथे तिथे प्रवेश आणि बढती देताना 
प्रगतीची गाडी किती अडखळते 
हे आरक्षणाचे खड्डे ओलांडताना 

आर्थिक बाबींवरच असावे आरक्षण 
देशाची प्रगती साधताना 
होईल का सुधारणा कोणा सरकारकडून 
सत्तेचे अवघड सुकाणू हाकताना 

बघुयात कोण घालतय लगाम 
या बेफाम घोडयांना 






Wednesday 23 March 2016

कविता (जागतिक कविता दिन विशेष)

जागतिक कविता दिन विशेष
२१ मार्च

-------------------------------------------

शब्दरुपी अश्वावर आरूढ होते मी
काव्य प्रतिभेच्या पंखांनी भरारी घेते मी
कल्पनेच्या विश्वात संचार करिते मी
भावनांच्या तरंगांवर झुलते मी

यमकाचे बोट धरुनी
रचिले जाते मला
छंद-वृत्त आणि अलंकारांनी
सजविले जाते मला

कधी संगीताच्या तालावर
ठेका मी धरते
गीत रुपामध्ये
रसिकांसमोर अवतरते

कधी प्रेमाच्या तर कधी विरहाच्या
कधी राजकीय तर कधी सामाजिक 
अशा विविध वस्त्रांनी नटत असते मी
भाषेच्या आणि  प्रांताच्या
जातीच्या आणि धर्माच्या
पल्याड जाऊन वावरत असते मी

कलेच्या अथांग सागरात
नौकाविहार करत असते मी

कलावंत आणि दर्दी रसिकांच्या
शोधात असते मी

आजच्या जागतिक काव्यदीनी
कवितेच्या या रुपामध्ये
आपल्यासमोर प्रकट झाले मी