Sunday 25 December 2016

विमुद्रीकरण

demonetisation.
विमुद्रीकरण
----------------------------------
नोटाबंदीमुळे  बाद  झाल्या
पाचशे आणि हजाराच्या नोटा
बराच मोठा चलनसाठा
झाला अचानक खोटा

अपुऱ्या तयारीनिशी
टाकले गेले पाऊल
चलनतुटवड्यामुळे अराजकतेची
लागली होती चाहूल

नवीन चलन म्हणून आली
पहिली दोन हजाराची नोट
रंग निघत असल्यामुळे
त्यातही निघाली खोट

दोन हजाराची नोट ही
कोणाची आहे बरे शक्कल
बरीच चर्चेत आहे
सध्या यामागची अक्कल

या नोटांचे शल्य
आहे काहीसे वेगळे
असून खिशात काही
होतो आम्ही पांगळे

आकारांमुळे नवीन नोटा
झाल्या एटीएममधून वजा
एटीएम झाले शोभेचे आणि
सर्वानाच मिळाली सजा

काळा आणि पांढरा असा भेदभाव
पैशालाही नाही चुकला
वर्णविरहित व्यवस्थेला
बिचारा पैसाही मुकला

विरोधकांच्या हाती आयते
मिळाले आहे गाजर
कधी नव्हे तो सामान्यांसाठी
फुटतो आहे पाझर

काही धनाढ्य लोकांनी
आळवला आहे नाराजीचा सूर
शेकोटीच्या नावाखाली
निघतो आहे वेगळाच धूर

नव्या काळ्या पैशासाठी
दलालांचे बँकेत लागले आकडे
काळ्या पैशाच्या खबरीसाठी
सरकारचे जनतेलाच साकडे

विनारोकड व्यवहारांसाठी
सरकारचा आहे आग्रह
पण नको ते तंत्रज्ञान
असा खूप जणांचा निग्रह

सरकारचे रोज येते आहे
नवनवीन धोरण
कधी लागणार आहे देशाला
फक्त पांढऱ्या पैशाचे तोरण

थोडीशी का होईना आपल्याला
सोसावी लागते आहे कळ
पण काही दिवसांनी निश्चित
मिळेल मधुर असे फळ
                 - Sameer J.
---------------------------------
---------------------------------