Wednesday 23 March 2016

कविता (जागतिक कविता दिन विशेष)

जागतिक कविता दिन विशेष
२१ मार्च

-------------------------------------------

शब्दरुपी अश्वावर आरूढ होते मी
काव्य प्रतिभेच्या पंखांनी भरारी घेते मी
कल्पनेच्या विश्वात संचार करिते मी
भावनांच्या तरंगांवर झुलते मी

यमकाचे बोट धरुनी
रचिले जाते मला
छंद-वृत्त आणि अलंकारांनी
सजविले जाते मला

कधी संगीताच्या तालावर
ठेका मी धरते
गीत रुपामध्ये
रसिकांसमोर अवतरते

कधी प्रेमाच्या तर कधी विरहाच्या
कधी राजकीय तर कधी सामाजिक 
अशा विविध वस्त्रांनी नटत असते मी
भाषेच्या आणि  प्रांताच्या
जातीच्या आणि धर्माच्या
पल्याड जाऊन वावरत असते मी

कलेच्या अथांग सागरात
नौकाविहार करत असते मी

कलावंत आणि दर्दी रसिकांच्या
शोधात असते मी

आजच्या जागतिक काव्यदीनी
कवितेच्या या रुपामध्ये
आपल्यासमोर प्रकट झाले मी